राजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी

  • homeराजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी

आमदार अभिमन्यू पवार यांनी विविध उद्योगसमूहांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून औसा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अत्याधुनिक शिक्षण सुविधांची उभारणी करून जिल्हा परिषद शाळा दर्जोन्नत करण्यासाठी "राजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी" हे कल्पक, अभिनव आणि महत्वकांक्षी अभियान हाती घेतले आहे.
औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठक्रमातील आणि पाठ्यक्रमाबाहेरील शिक्षणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी "राजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी" अभियानाअंतर्गत ५० लक्ष रु. प्रति जिल्हा परिषद शाळा खर्चून १३ घटक विकसित केले जात आहेत.
पहिल्या टप्यातील जिल्हा परिषद प्रशाला, लामजना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरफळ व जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा, कासार सिरसी या ३ शाळांमधील कामे पूर्ण झाली असून दुसऱ्या टप्यातील १५ शाळांमध्ये कामे प्रगतीपथावर आहेत.

अभियानाची उद्दिष्टे:

=> नवोदय विद्यालये / सैनिक शाळा / केंद्रीय विद्यालये / कॉन्व्हेंट स्कूल्स च्या धर्तीवर औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा विकसित करणे.
=> सैद्धांतिक (Theoretical) शिक्षणाला प्रात्यक्षिक (Practical) शिक्षणाची जोड देणे.
=> विद्यार्थ्यांच्या चित्रकला / गायन / वादन / क्रीडा अशा विविध कलागुणांना वाव मिळवून देणे.
=> पाठयक्रम शिक्षणासोबत जीवनावश्यक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
=> विद्यार्थ्यांना पाठयक्रमाबाहेरील शिक्षणाच्या (वेगवेगळ्या भाषा, उच्च तंत्रज्ञान इत्यादी) संधी उपलब्ध करून देणे.

कॉम्पुटर लॅब [Computer Lab]:

=> पार्श्वभूमी :
• आजचे जग हे स्पर्धेचे जग आहे. शालेय जीवनात कॉम्पुटर हाताळायला न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे पडतात.
• आज जगात कुठलीही नोकरी किंवा व्यवसाय असा उरलेला नाही ज्यासाठी कॉम्पुटर वापरण्याची गरज पडत नाही.

=> उद्दिष्ट :
• ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातच कॉम्प्युटर्सचा पाया मजबूत करायचा आणि स्पर्धेसाठी त्यांना तयार करायचे.

=> तपशील :
• प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्येनुसार १० - २५ कॉम्प्युटर्सची अद्ययावत लॅब उभारण्यात येत आहे.
• उच्च दर्जाचे फर्निचर, खुर्च्या, इंटरनेट सुविधा, प्रिंटर, इन्व्हर्टर, सिलिंग, इ. सुविधांसह सुसज्ज व अत्याधुनिक लॅब उभारली जात आहे.

=> दूरगामी फायदे :
• कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ज्ञानभांडार खुले होईल.
• जिल्हा परिषद शाळांमधून चांगले तंत्रज्ञ व अभियंते घडतील.
• विद्यार्थ्यांना विविध ऑनलाईन कोर्सेस मोफत करता येतील.

स्मार्ट क्लासरूम [Smart Classroom]:

=> पार्श्वभूमी :
• जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वीसारखे प्रत्येक विषयाला त्या त्या विषयाचे विशेषज्ञ शिक्षक शिकवत नाहीत तर एक शिक्षक अनेक विषय शिकवतात.
• शाळेत राहूनच शाळेबाहेरील तज्ञ शिक्षकांकडून / नावाजल्या संस्थांकडून शिकण्याची व्यवस्था नाही.
=> उद्दिष्ट :
• आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी शाळेत बसूनच वेगवेगळ्या विषयांच्या तज्ञांकडून शिकू शकतील अशी व्यवस्था उभारणे.
=> तपशील :
• प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत ७५ इंची स्मार्ट टीव्ही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॅसिलिटी व इंटरनेट सुविधांनी युक्त अशी स्मार्ट क्लासरूम उभारण्यात येत आहे.
=> दूरगामी फायदे :
• जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतूनच वेगवेगळ्या भाषा शिकता येणार आहेत.
• जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळोवेळी यशस्वी उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, तंत्रज्ञ, वैज्ञानिक, खेळाडू व कलाकार यांच्याशी प्ररेणादायी संवाद साधता येणार आहे.
• जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय महाराष्ट्रातील तज्ञांकडून शिकता येणार आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळा [Science & Technology Lab]:

=> पार्श्वभूमी:
• जिल्हा परिषद शाळांमध्ये विज्ञान विषयाचे सैद्धांतिक ज्ञान प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजून घेण्यास वाव नसल्याने विद्यार्थी विज्ञानासारख्या विषयापासून दुरावतात तर उच्च
तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ राहतात.
=> उद्दिष्ट:
• ५ वी ते १० वी विज्ञान विषयांमधील सर्व वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजून घेता येतील तसेच रोबोट, सॅटेलाइट, ड्रोन, एआय इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचे आविष्कार शाळेतच समजून घेता येतील अशी व्यवस्था उभारणे.
=> तपशील:
• ५ वी ते १० वी विज्ञान विषयांमधील सर्व वैज्ञानिक संकल्पना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून समजून घेता येतील अशी विज्ञान प्रयोगशाळा औसा मतदारसंघातील शाळांमध्ये उभारली जात आहे.
• रोबोट, सॅटेलाइट, ड्रोन, एआय इत्यादी उच्च तंत्रज्ञानाचे आविष्कार शाळेतच समजून घेता येतील अशी व्यवस्था औसा मतदारसंघातील शाळांमध्ये उभारली जात आहे.
=> दूरगामी फायदे:
• जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञानासारखा किचकट वाटणारा / नाआवडीचा विषय सोपा /आवडीचा वाटायला लागेल.
• भविष्यात चांगले वैज्ञानिक / तंत्रज्ञ निर्माण होतील.

वाचनालय [Library]:

=> पार्श्वभूमी:
• ग्रामीण भागात वाचण्यासाठी पुस्तकेच उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होत नाही.
=> उद्दिष्ट:
• वाचनाची सवय लागावी यासाठी ऐतिहासिक, वैज्ञानिक, जीवनचरित्रे, सामान्य ज्ञान, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबऱ्या, विज्ञान कथा इत्यादी साहित्य प्रकारची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.
=> तपशील:
• औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये १००० पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय उभारण्यात येत आहे.
=> दूरगामी फायदे:
• जिल्हा परिषद शाळेतील विद्यर्थ्यांना वाचनाची सवय लागेल.
• विद्यार्थ्यंनाच्या माहितीच्या कक्षा विस्तारतील.
• विद्यार्थ्यांची संस्कृती/इतिहासाशी नाळ घट्ट होईल.
• भविष्यात चांगले साहित्यिक घडतील.

जीवन कौशल्ये प्रशिक्षण केंद्र [Life Essential Skills Training Centre]:

=> पार्श्वभूमी:
• शाळेत जीवनावश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थी मोठेपणी त्यांच्या वैयक्तिक जीवनात महत्वाच्या कामांसाठी परावलंबी बनतात.
=> उद्दिष्ट:
• औसा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये जीवनावश्यक कौशल्ये प्रशिक्षण केंद्र उभारून विद्यार्थ्यांना जीवनावश्यक कामांसाठी स्वावलंबी बनवणे.
=> तपशील:
• औसा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ड्रिलिंग, पैंटिंग, कॉम्पुटर रिपेरिंग, इलेक्ट्रिकल वर्क, कूकिंग, शेतीची कामे इ. प्रकारच्या अत्यावश्यक कामांचे प्रशिक्षण देणारे जीवन कौशल्ये प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे.
=> दूरगामी फायदे:
• दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक कामांसाठी स्वावलंबी असलेले नागरिक तयार होतील.

क्रीडा केंद्र [Sports Centre]:

=> पार्श्वभूमी:
• शाळेत • तरुण वर्ग मातीच्या खेळांपासून दूर चालला आहे, त्यामुळे तरुणांचा फिटनेस आणि स्टॅमिना कमी होत चालला आहे.
• मातीतील अनेक खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
• ग्रामीण भागात खेळांचे मैदान आणि साहित्य उपलब्ध नसल्याने आवड असूनही मुलांना खेळ खेळात येत नाहीत.
=> उद्दिष्ट:
• प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत क्रीडा केंद्र उभारून मातीतील खेळ खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करायचे आणि खेळ संस्कृती पुनर्जीवित करायची
=> तपशील:
• क्रीडा मापदंडानुसार तिथे खो-खो, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, हॉलीबॉल, बॅडमिंटन, लगोरी इ. प्रकारच्या मैदानी खेळांसाठी मैदान विकसित करून त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.
=> दूरगामी फायदे:
• क्रीडा संस्कृती पुनर्जीवित होईल.
• मुलांचा फिटनेस आणि स्टॅमिना वाढेल.
• जिल्हा परिषद शाळांमधून भविष्यात चांगले खेळाडू तयार होतील.

आत्मनिर्भर शाळा [Self-Reliant School]:

=> पार्श्वभूमी:
• विद्युत पुरवठा, साऊंड सिस्टिम व विविध बाबींसाठी जिल्हा परिषद शाळा या परावलंबी असतात.
• बऱ्याच शाळांचा विद्युत पुरवठा हा वीजबिल भरणा न झाल्यामुळे महिनोंमहिने खंडित झालेला असतो.
=> उद्दिष्ट:
• आत्मनिर्भर भारताच्या धर्तीवर मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळाही आत्मनिर्भर बनवणे.
=> तपशील:
• विजेच्या बाबतीत शाळांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रत्येक शाळेत 4 KW क्षमतेचे सौर प्रकल्प (सोलर प्लांट) उभारण्यात येत आहे.
• विविध कार्यक्रमांसाठी शाळांना चांगली साऊंड सिस्टिम, माईक, डायस इत्यादी गोष्टी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
• शासकीय नियमानुसार महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करता याव्यात यासाठी महापुरुषांच्या फोटो उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
=> दूरगामी फायदे:
• वीजपुरवठा कधीही खंडित होणार नाही आणि विविध उपक्रम व्यवस्थितपणे साजरे करता येतील.

स्वच्छ, सुंदर आणि हरित शाळा [Clean, Green & Beautiful School]:

=> पार्श्वभूमी:
• अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही, अस्वच्छ पाणी पिल्यामुळे अनेक आजार जडतात.
• अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांना; विशेषतः मुलींना त्रास सहन करावा लागतो.
• शाळेत स्वच्छता ठेवण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसते, त्यामुळे शाळेत अस्वच्छता निर्माण होते.
• अनेक ऑक्सिजन समृद्ध देशी झाडे मुलांना ओळखताही येत नाहीत इतकी आजची पिढी निसर्गापासून दुरावली आहे.
=> उद्दिष्ट:
• जिल्हा परिषद शाळांना स्वच्छ, सुंदर व हरित शाळा म्हणून विकसित करणे.
=> तपशील:
• जिल्हा परिषद शाळांमध्ये ५०० लिटर प्रति तास क्षमतेचे Water Filter बसवून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
• जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वच्छतागृह उभारले जात आहे, स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था करून स्वच्छता राखली जाईल याची काळजी घेतली जात आहे.
• मुलींसाठी लेडीज रूममध्ये पॅड व्हेंडिंग व बर्निंग मशीन लावली गेली असून पॅड्स मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
• शाळा स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे.
• जिल्हा परिषद शाळांमध्ये ऑक्सिजन पार्क व परसबागेची उभारणी केली जात आहे.
• प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड दत्तक दिले जात आहे.
• जिल्हा परिषद शाळांमध्ये रंगरंगोटी करून शाळा रम्य बनवल्या जात आहेत.
=> दूरगामी फायदे:
• विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील.
• स्वच्छता हा शालेय जीवनापासून जीवनशैलीचा भाग बनेल.
• विद्यार्थी निसर्गाच्या जवळ येतील.

खुली व्यायामशाळा [Open Gym]:

• ग्रामीण भागात व्यायामाचे साहित्य नसल्याने योग्य वयात व्यायामाची गोडी लागत नाही.
• जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व सोयिनीं युक्त खुली व्यायामशाळा उभारण्यात येत आहे.
• या खुली व्यायामशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा फिटनेस वाढण्यास मदत मिळेल आणि फिट इंडिया चे उद्दिष्ट साधता येईल.

संगीत चित्रकला आणि संस्कार केंद्र [Music, Art & Value Edu. Centre]:

• अनेक विद्यार्थ्यांना संगीत व चित्रकलेची आवड असते पण या आवडीनिवडी जोपासण्यासाठी आवश्यक सुविधा शाळांमध्ये नसतात.
• विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा म्हणून जिल्हा परिषद शाळांमध्ये संगीत केंद्र आणि चित्रकला केंद्र उभारण्यात येत आहे.
• मूल्य शिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली असून विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण देणारे संस्कार केंद्र जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येत आहे.
------------------ संकल्प ------------------
"राजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी" अभियानाअंतर्गत पहिल्या ३ शाळांचे काम पूर्ण झाले असून १५ शाळांचे काम प्रगतीपथावर आहे. औसा विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये उपरोक्त १३ घटके विकसित करून शिक्षण सुविधांचा एक आगळावेगळा औसा पॅटर्न महाराष्ट्रासमोर सादर करण्याचा आमदार अभिमन्यू पवार यांचा मानस आहे.