शेत तिथे रस्ता

  • homeशेत तिथे रस्ता

ग्रामीण भागातील बहुतांश वादांना शेतीचा बांध किंवा शेतरस्ता हेच प्रमुख कारण असते. आमदार अभिमन्यू पवार यांच्याच शब्दात सांगायचे तर "शेत हे जर शेतकऱ्यांचे हृदय असेल तर शेतरस्ते या रक्तवाहिन्या (धमन्या) आहेत". अतिक्रमणामुळे या रक्तवाहिन्या अनेक ठिकाणी ब्लॉक झाल्या होत्या. शेत/पाणंद/शिवरस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांचे हृदय पुन्हा धडधडते करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी "शेत तिथे रस्ता" हे अभियान हाती घेतले.

पार्श्वभूमी

२१ ऑक्टोबर २०१९, औसा मतदारसंघातील विधानसभा मतदानाचा दिवस. उमेदवार असल्याने आमदार अभिमन्यू पवार हे जास्तीत जास्त मतदान केंद्रांना भेटी देण्याच्या गडबडीत होते. त्या दिवशी त्यांना मतदारसंघातील कोराळी गावावरून कोणाचातरी कॉल आला. त्यांनी सांगितलं की इसाक मुजावर नावाच्या भूमिहीन शेतकऱ्याची सोयाबीनची बनीम कुणीतरी जाळलीय. या शेतकरी दाम्पत्यानं एका शेतकऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करत करत दुसऱ्या एका शेतकऱ्याचे शेत भागीन म्हणून/हिस्याने/बटईने करत सोयाबीनचे पीक घेतलेले. दिवसा ते शेतमालकाच्या आणि रात्री भागनाच्या शेतात काम करायचे. २५-३० गठ्ठे सोयाबीन होईल अशी बनीम कोणीतरी जाळलेली. आ अभिमन्यू पवार हे दुसऱ्या दिवशी नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेटायला गेले तेंव्हा त्या शेतकरी दाम्पत्याने अक्षरशः हंबरडा फोडला. पुढे निवडणूक निकालानंतर काही दिवसांनी अशीच घटना कल्याणी माळेगाव येथील कै. वीरभद्र हरनाळे यांच्या बाबतीतही घडलेली. घरातील कर्त्या पुरुषाचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे विधवा पत्नी हौसाबाई, दहावीत शिकणारी मुलगी आणि आठवीतील मुलगा या मायलेकरांनी मिळून गोळा केलेली बनीमही कोणीतरी पेटवून दिली. स्वतःच्या लेकरांच्या वयाच्याच त्या २ लेकरांच्या हातावरील फोड बघून आ अभिमन्यू पवार यांच्याही डोळ्यात त्यावेळी पाणी आलेलं.

आ अभिमन्यू पवार जेंव्हा या गोष्टींचे मूळ शोधू लागले तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की बहुतांश शेतकऱ्यांना शेताकडे जायला रस्ताच नाही. बहुतांश शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेचे १ प्रमुख कारण म्हणजे नसलेला शेतरस्ता. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन आणि हरभरा/ज्वारीच्या राशी एकसाथ होत आहेत कारण रस्ता नाही. मुबलक पाणी आहे पण भाजीपाला/फळबाग/ऊस /रेशीम/नर्सरी तत्सम पिके घेऊ शकत नाही कारण वाहन जायला रस्ताच नाही. कुक्कुटपालन/दुग्ध व्यवसाय/शेळीपालन/वराह पालन/मत्स्यपालन वा इतर कुठला जोडधंदा करू शकत नाही कारण रस्ताच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील ४-५ एक्करचा शेतकरी चारचाकी घेऊन फिरतोय आणि इथं मराठवाड्यातील १० एक्करचा शेतकरी खत-बियाला पैसे कुणाकडून उसने घ्यायचे या विवंचनेत फिरतोय. जो शेतकरी इतर २ - ४ जणांना रोजगार देऊ शकतो तो आज कुणाच्या तरी किराणा दुकानात, कापड दुकानात किंवा एमआयडीसीत काम करतोय या सत्य परिस्थितीने त्यांना अनंत वेदना दिल्या आणि त्यांनी किमान औसा मतदारसंघापुरते तरी हे चित्र बदलण्याचा निर्धार केला. या निर्धारातूनच जन्म झाला "शेत तिथे रस्ता" या महत्वकांक्षी अभियानाचा.

अभियानाची पायाभरणी

मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतापर्यंत जायला रस्ता उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर आ अभिमन्यू पवार यांनी शेतकरी बांधवांना आणि गावोगावच्या नेतेमंडळींना विश्वासात घेण्यासाठी मतदारसंघात गावोगावी जाऊन ८६ सभा घेतल्या. मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्यासाठी मनरेगातून ग्रामविकास या विषयावर २ ऑनलाईन आणि मा जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत १ प्रत्यक्षात अशा ३ कार्यशाळा घेतल्या. सभा, बैठका आणि कार्यशाळांच्या माध्यमातून गावपातळीवरील अधिकारी आणि पुढारी यांच्यात सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली. आ अभिमन्यू पवार यांनी अधिकाऱ्यांच्या १० पेक्षा अधिक आढावा बैठका घेऊन त्यांना विश्वास दिला. राजकीय नफा तोट्याचा विचार न करता त्यांनी शेतकरी बांधवांना स्पष्टपणे सांगितले की 'नकाशावरील शेतरस्ते हे तुमचे नाहीत तर ते शासनाचे आहेत. प्रशासन चर्चा करून, प्रसंगी कायद्यानं दिलेला अधिकार वापरून शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करेल मी मध्ये येणार नाही'. यातून अधिकारी वर्गात सकारात्मक संदेश गेला आणि तेही जोमाने कामाला लागले. जमीन महसूल कायदा १९६६, कलम १४३ नुसार तहसीलदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा शेतरस्ता उपलब्ध करून देतात तर मामलेदार कोर्ट ऍक्ट १९०६, कलम ५ नुसार तहसीलदार शेतरस्त्यांवरील अतिक्रमणे काढून शेतरस्ता मोकळा करून देतात. कायद्याने दिलेले अधिकार आवश्यकता पडेल तिथे वापरा असा स्पष्ट संदेश दिला. यात आ अभिमन्यू पवार यांच्यासाठी राजकीय जोखीम होती पण शेतकरीहितापुढे राजकीय जोखमीची चिंता त्यांनी केली नाही.

अडचण तिथे मार्ग

शेतरस्त्यांसाठी राज्यस्तरावर कुठली योजना किंवा प्रवर्ग नसल्याचे लक्षात आल्यानंतर आ अभिमन्यू पवार यांनी आपला संपूर्ण स्थानिक विकास निधी (आमदार निधी) शेतरस्त्यांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. आमदार निधीतून शेतरस्त्यांचे काम करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळेच असेल कदाचित पण शेतरस्त्यांचे काम आमदार निधीतून करण्यासंदर्भात काही नियमच नव्हते. आ अभिमन्यू पवार यांनी मा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन यासंदर्भात SOP जारी करण्याची विनंती केली. SOP जारी झाल्यानंतर कुठे प्रशासनात या विषयासंदर्भात स्पष्टता आली. आणि अभियानाला गतीही आली. सर्व दिव्ये पार करत २१ फेब्रुवारी, २०२१ अभियानाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. काम सुरु झाल्यानंतर गैरसमजुतीतून तुरळक ठिकाणी शेतरस्त्याचे काम अडवण्याचे प्रकारही घडले पण आमदार अभिमन्यू पवार यांनी नियामक बैठक घेत आणि प्रसंगी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला. अभियान पुढे सरकू लागल्यानंतर निधी कमी पडू लागला तेंव्हा आ अभिमन्यू पवार यांनी भारतीय जैन संघटनेसारख्या सामाजिक संघटनांकडून मोफत मशिन्स उपलब्ध करून घेतल्या.

अभियानाची यशोगाथा

शेत तिथे रस्ता अभियानांतर्गत आत्तापर्यंत १४०० किमी पेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून मातीकाम व दबई काम पूर्ण करण्यात आले आहे तर ५०० किमी पेक्षा अधिक लांबीच्या शेतरस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण काम पूर्ण करण्यात आले आहे. या शेतरस्त्यांमध्ये २ गावांना जोडणाऱ्या शेतरस्त्यांपासून २ राज्यांना जोडणाऱ्या शेतरस्त्याचा समावेश आहे. आ अभिमन्यू पवार यांच्या या अभियानाची प्रेरणा घेऊन राज्य सरकारने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना कार्यान्वित केली. शेतरस्त्यांचा हा औसा पॅटर्न संपूर्ण देशासाठी पथदर्शी ठरला आहे.