शेत तिथे रस्ता, मनरेगातून ग्रामसमृद्धी, हरित बंधारे समृद्ध शेतकरी इ शेतकरी हिताच्या नाविन्यपूर्ण अभियानांमुळे अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक आश्वासक लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या श्री अभिमन्यू पवार यांचा जन्म १ जुलै, १९७१ रोजी उंबडगा (ता. औसा, जि. लातूर) या खेडेगावात झाला. आ अभिमन्यू पवार यांचे वडील ह भ प श्री दत्तात्रय पवार गुरुजी यांनी शिक्षक म्हणून शेकडो विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले तर आई सौ पार्वतीबाई यांनी रामजन्मभूमी आंदोलनात कारसेवक बनून अयोध्यानगरीत कारसेवा बजावलेली. आ अभिमन्यू पवार यांच्या आई-वडिलांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांमध्ये वनवासी कल्याण आश्रमात १५ वर्ष पूर्णवेळ सेवा केली आहे. त्यामुळे आ अभिमन्यू पवार यांना वारकरी संस्कार, हिंदुत्वाच्या विचारधारेप्रती ओढ आणि समाजसेवेचे बाळकडू घरीच मिळाले.
आ अभिमन्यू पवार यांनी शालेय शिक्षण केशवराज विद्यालय, लातूर येथून तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केले. आ अभिमन्यू पवार यांनी पुणे विद्यापीठातून कर्मचारी व्यवस्थापन (Masters in Personnel Management) या विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे.
नवनव्या गोष्टी करण्यासाठी कायम उत्साही राहणाऱ्या अभिमन्यू पवारांनी सुरुवातीच्या काळात झेरॉक्स दुकान, रेस्टॉरंट आणि बांधकाम अशा अनेक व्यवसायांचा अनुभव घेतला आहे.
आई - वडील स्वतःच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने अभिमन्यू पवार यांची पावले नकळत्या वयात संघशाखेकडे वळली. घर आणि संघशाखा या दोन्ही ठिकाणी त्यांच्या बालमनाला समाजसेवेचे, राष्ट्रप्रेमाचे आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचे संस्कार मिळाले. लहान वयात संघ शाखेत जाणारे आणि महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे अभिमन्यू पवार पुढे चालून आपसूकच भारतीय जनता युवा मोर्चात आणि त्यापुढे जाऊन भारतीय जनता पक्षात सक्रिय झाले. लातूर शहरातील एका वॉर्डचे भारतीय जनता पक्षाचे वॉर्ड प्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेश करणाऱ्या अभिमन्यू पवारांना पक्षाच्या विचारधारेवरील श्रद्धा, अफाट कष्ट करण्याची तयारी आणि अंगी लढाऊ बाणा भिनला असल्यामुळे पक्षात नवनव्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. भारतीय जनता पक्षाच्या संघर्षाच्या काळात त्यांनी युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष, भाजप लातूर शहर जिल्हा सरचिटणीस अशा अनेक पदांवर काम केले.
त्यांच्या कामाची धडाडी पाहून, २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पक्ष प्रभारी श्री ओम प्रकाश माथूर जी व श्री राजीव प्रताप रुडी जी यांचे सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर नूतन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी दिली. मुख्यमंत्री कार्यालयात काम करताना त्यांनी स्वीय सहाय्यकाची खुर्ची लोकाभिमुख करून दाखविली. आमदार अभिमन्यू पवार हे २०१९ पासून औसा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आ. अभिमन्यू पवार हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आहेत. शेत तिथे रस्ता, मनरेगातून ग्रामसमृद्धी व राजमाता जिजाऊ - शाळा माझी न्यारी सारख्या कल्पक अभियानाच्या माध्यमातून त्यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.