औसा हे तालुक्याचे ठिकाण, तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांच्या उलाढालीचे केंद्र आणि ३ महामार्गांच्या कडेला वसलेले शहर. औसा शहरात सध्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. औसा शहराची आणि तालुक्याची लोकसंख्या पाहता औसा शहरात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशी मागणी मागच्या अनेक वर्षांपासून केली जात होती. औसा शहर हे लातूर शहरापासून (जिल्ह्याच्या ठिकाणापासून) केवळ १८ किमी अंतरावर असल्याने औसा येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होण्यास तांत्रिक अडचण येत होती. अभिमन्यू पवार यांनी आमदार झाल्यानंतर ३० खाटांच्या औसा ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन व्हावे यासाठी पाठपुरावा सुरु केला. तत्कालीन आरोग्यमंत्री मा राजेश टोपे, आरोग्यमंत्री मा प्रा तानाजीराव सावंत यांच्या प्रत्येकी ४-५ वेळा भेटी घेऊन तसेच विविध वैधानिक आयुधांच्या मदतीने विषय सभागृहात मांडत आ अभिमन्यू पवार यांनी औसा उपजिल्हा रुग्णालयाचा विषय लावून धरला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून ३ ऑक्टोबर, २०२३ रोजी ३० खाटांच्या औसा ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी प्राप्त झाली.
आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वतः लक्ष घालून उपजिल्हा रुग्णालयासाठी २ एक्कर क्षेत्रावर G+3 इमारतीचा १५० कोटींचा आराखडा सादर झाला. ११ मार्च रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत औसा उपजिल्हा रुग्णालय इमारत (G+1) बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ७७ कोटी ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला, १३ जून, २०२४ रोजी त्यासंदर्भातील प्रशासकीय आदेश निर्गमित करण्यात आला
तळमजला/Ground Floor
आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मराठवाड्यातील पहिले तर महाराष्ट्रातील दुसरे स्वतंत्र आयुष रुग्णालय किल्लारी येथे उभारण्यास मंजुरी प्राप्त झाली. याठिकाणी शल्यकर्म व पंचकर्म उपचारपद्धतींसह विविध आयुष उपचार पद्धतींद्वारे रुग्णांवर उचार केले जाणार आहेत. किल्लारी येथे आयुष रुग्णालय कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही जागेअभावी जिल्हा रुग्णालय होऊ शकलेले नाही. मुख्यमंत्री कार्यालयात असताना २०१८ पासून अभिमन्यू पवार यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत येणाऱ्या लातूर कृषी महाविद्यालयाची जागा रुग्णालयासाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरु केले. अटल आरोग्य शिबिरासाठी लातूरला आलेले तत्कालीन मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही त्यांनी हा विषय मांडला आणि अखेर ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची वापरात नसलेली १० एक्कर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला.
२०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर निधीच्या तरतुदीअभावी लातूर जिल्हा रुग्णालय जागा हस्तांतरणाचा विषय रखडला, २०२३ मध्ये या विषयासाठी लातूरमध्ये तीव्र उपोषणही करण्यात आले. उपोषकर्त्यांना शब्द दिल्याप्रमाणे आ अभिमन्यू पवार यांनी या विषयासाठी शासनदरबारी पुन्हा जोरदार पाठपुरावा केला आणि १९ जून, २०२४ रोजी जागा हस्तांतरणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लातूर कृषी महाविद्यालय आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ला देय असलेल्या ३ कोटी ३२ लाख निधीची तरतूद करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यामुळे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन जिल्हा रुग्णालयाचे काम लवकरच सुरु होईल.
महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गोरगरीब रुग्णांना 1.5 लक्ष रु. पर्यंतचे मोफत आरोग्यविमा कवच मिळते. २०१२ साली सुनिश्चित करण्यात आलेल्या 1.5 लक्ष रु. विमा कवच मर्यादेत वाढ करण्याची गरज ओळखून आ अभिमन्यू पवार यांनी ५ नोव्हेंबर, २०२२ रोजी उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. यावेळी "महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विमा कवच वाढवून ५ लक्ष रु. करण्यात यावे, तालुकानिहाय नविन रुग्णालये योजनेशी संलग्न करण्यात यावीत, जन आरोग्य योजनेत ९९६ आजारांचा समावेश असून आयुष्मान भारत योजनेच्या धर्तीवर १२०६ आजारांचा समावेश करण्यात यावा तसेच केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना यांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात यावी" अशा मागण्या त्यांनी मा उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या.
९ मार्च, २०२३ रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मा अर्थमंत्र्यांनी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विमा कवच वाढवून ५ लक्ष रु. करण्याचा आणि योजनेत समावेश नसलेल्या काही आजारांचा नव्याने समावेश करण्याचा निर्णय जाहीर केला. २८ जून, २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुषमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यास तसेच २ कोटी कार्ड्स वितरित करण्यासही मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत गोरगरीब रुग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देता येते. आ अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून औसा मतदारसंघातील व लातूर जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे.
मार्च २०२० मध्ये देशातील कोव्हीड (कोरोना) ग्रस्तांची संख्या चिंताजनक पातळीवर गेल्यामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. २१ दिवसांच्या पहिल्या टाळेबंदीत आ अभिमन्यू पवार हे आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार घरीच थांबले. टाळेबंदीत वाढ होऊ लागल्याने नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागू लागल्यानंतर आ अभिमन्यू पवार यांनी तात्काळ नियमांचे पालन करत कार्यरत होण्याचा निर्णय घेतला. योग्य ती काळजी घेऊनही ८ जुलै, २०२० रोजी त्यांना व त्यांचा मुलगा अॅड परीक्षित यांना कोरोनाची लागण झाली. आ अभिमन्यू पवार यांच्याजवळ लातूर, पुणे, नागपूर व मुंबई येथील नामांकित खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा पर्याय सहज उपलब्ध होता पण संकटकाळात जनतेचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा या भावनेतून लातूरच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. आ अभिमन्यू पवार हे उपचारादरम्यान दिवसातून २ वेळा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांना धीर देण्याचे काम करायचे. त्याकाळी कोरोनमुक्त झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा देऊन कोरोनाग्रस्त रुग्ण बरे केले जायचे पण प्लाझ्मा डोनेशनबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज होते. आ अभिमन्यू पवार व त्यांचा मुलगा अॅड परीक्षित यांनी प्लाझ्मा डोनेशन करण्याचा निर्णय निर्णय घेतला आणि २१ ऑगस्ट, २०२० रोजी शासकीय मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे त्यांनी प्लाझ्मा डोनेट केला. कोरोना काळात प्लाझ्मा डोनेट करणारे ते महाराष्ट्रातील पहिले आमदार आहेत.
आमदार अभिमन्यू पवार २०२१ साली भाजपा नेते मा देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या माध्यमातून औसा मतदारसंघासाठी ६ अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या. त्यातील ३ रुग्णवाहिका या प्रत्येकी १ प्रमाणे औसा ग्रामीण रुग्णालय, किल्लारी ग्रामीण रुग्णालय व कासार सिरसी ग्रामीण रुग्णालय ना देण्यात आल्या तर ३ रुग्णवाहिका उजनी, कासार बालकुंदा व औसा येथून फाऊंडेशनमार्फतच ना नफा ना तोटा तत्वावर चालवल्या जात आहेत. त्यानंतर औसा मतदारसंघातील मदनसुरी, कासार बालकुंदा, रामलिंग मुदगड, हासेगाव, जवळगा, लामजना, मातोळा, उजनी व बेलकुंड या ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी त्यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून लातूर जिल्हा परिषद मार्फत ९ रुग्णवाहिका मंजूर करवून घेतल्या. या रुग्णवाहिका २६ जानेवारी, २०२२ रोजी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुपूर्द करण्यात आल्या. या १५ रुग्णवाहिका औसा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेत आहेत.