कुठलीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी राजकारणात इथपर्यंत पोहचण्यासाठी आणि पक्षाला लातूर जिल्ह्यात बळकटी देण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून शिवाजीरावजी पाटील निलंगेकर, शिवराजजी पाटील चाकूरकर व विलासरावजी देशमुख या काँग्रेस नेत्यांनी लातूरचे राजकीय आणि सामाजिक अवकाश व्यापलेले होते. काँग्रेस पक्षानं लातूर जिल्ह्यातील नेत्यांना कधी केंद्रात/राज्यात महत्वाचे मंत्रिपद, कधी मुख्यमंत्रीपद तर कधी केंद्रीय गृहमंत्रीपद देऊन पक्षाला कायम ताकद दिली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत लातूर जिल्ह्यात ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करून भाजप टिकवली आणि वाढवली त्या कार्यकर्त्यांपैकी १ प्रमुख नाव म्हणजे अभिमन्यू पवार. संघर्षाच्या काळात अभिमन्यू पवार यांनी पक्षासाठी केलेल्या आक्रमक आंदोलनांसाठी ४० पेक्षा अधिक राजकीय गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले होते. २०१४ नंतर भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यानंतर या आक्रमक कार्यकर्त्याला आधी थेट मुख्यमंत्री कार्यालयात आणि नंतर आमदार म्हणून काम करण्याची संधी देऊन त्या संघर्षाचे सोने केले.
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक आणि आमदार म्हणून काम करताना अभिमन्यू पवार यांनी कुठली एक गोष्ट कमावली असेल तर ती गोष्ट म्हणजे 'माणसे'. अल्पावधीतच त्यांनी संपूर्ण राज्यात आपला अफाट जनसंपर्क निर्माण केला आहे. कामाचा प्रचंड व्याप असतानाही ते आलेला प्रत्येक फोन घेतात, आलेल्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय देतात आणि काम घेऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान करतात. कोरोनाच्या निर्बंधात ८-१० महिन्यांचा कालावधी गेलेला असला तरी आजपर्यंत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाला किमान ७-८ भेटी तरी नक्की दिलेल्या आहेत. गावात गेलं की अभिमन्यू पवार चौकात जनतेत सहज मिसळून गप्पा मारताना किंवा चौकातील एखाद्या हॉटेलवर बसून सर्वसामान्य नागरिकांसोबत चहा पिताना अनेकदा दिसून येतात. अफाट काम करण्याची वृत्ती आणि कामातून माणसे जोडण्याची पद्धत त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळेपण प्रदान करते.
अभिमन्यू पवार हे आज आमदार झाले असले आणि भविष्यात कुठल्याही पदावर गेले तरी कार्यकर्ता हीच त्यांची प्रमुख ओळख आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्यांनी स्वतःतला कार्यकर्ता मेहनतीने जपला आहे. पक्षानं एखादा कार्यक्रम दिला किंवा एखादा आदेश आला की त्यांच्यातला कार्यकर्ता धडाडीनं कामाला लागतो. पक्षाची पत्रकं वाटण्यापासून ते इतर सहकारी कार्यकर्त्यांसमवेत भेळ पार्टी करण्यापर्यंत आमदारकीचा अभिनिवेश त्यांच्या आडवा येत नाही.
प्रचंड मेहनत घेण्याची तयारी हा अभिमन्यू पवार यांच्या व्यक्तिमत्वाचा तिसरा विशेष पैलू. अभिमन्यू पवार यांच्या कामाचा आवाका इतका दांडगा की त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांनाही थकायला होते. विविध कामांच्या पाठपुराव्यासाठी महिन्यातून २-३ वेळा त्यांचा लातूर - मुंबई - लातूर हा प्रवास ठरलेला असतो. अधिवेशनासाठी मुंबई/नागपूरला गेले तरी शनिवारी मतदारसंघातील कार्यक्रमांसाठी ते औसाला येतात आणि पुन्हा सोमवारी सकाळी अधिवेशनासाठी मुंबई/नागपूरला परत जातात. त्यांच्या दौऱ्याची आखणी अशी असते की बऱ्याचदा एकेका दिवशी ते १०-१२ गावांना भेटी देतात/कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. तालुका आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठकांचा धडाका तर त्यांचा नियमितपणे सुरुच असतो. आत्तापर्यंत त्यांनी २००+ शासकीय बैठका घेतल्या आहेत. बैठकांना उपस्थिती लावली आहे विविध विषयांच्या पाठपुराव्यासाठी २०० + भेटी घेतल्या आहेत, एखाद्या आमदाराने केलेला हा विक्रमच असावा.
एखादा विषय हाती घेतला की तो तडीस जाईपर्यंत सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राहणं हा आणखीन एक आ अभिमन्यू पवार यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू. राज्यसेवा जागवाढ, सिंचन विहीर अनुदान वाढ सारखे अनेक विषय आहेत जे केवळ आणि केवळ आ अभिमन्यू पवार यांनी तगादा लावला म्हणून मार्गी लागले आहेत आणि शेतीची वाटणी/खरेदी विक्री दस्तांवर शेतरस्त्याचा उल्लेख करणं बंधनकारक करणे, रेशीम शेतीचे अनुदान वाढवणे, रेशीम विभाग कृषी विभागात वर्ग करणे सारखे असे अनेक विषय आहेत जे शासनदरबारी संथगतीने हाताळले जात असतानाही आ अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा करणं थांबवलेलं नाही.
आमदार अभिमन्यू पवार यांच्या डोक्यातून कायम नवनव्या संकल्पना जन्माला येत असतात. कुशल - अकुशलचे प्रमाण राखण्यासाठी वेगवेगळ्या लाभांचे पॅकेजेस तयार करण्याच्या त्यांच्या कल्पनेतून राज्याला मनरेगातून ग्रामविकासाचा एक महामार्ग गवसला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा सामूहिक विवाहसोहळा आयोजित करून त्यात स्वतःच्या मुलाचा विवाह करणे, दरवर्षी १ जानेवारीला मतदारसंघात आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करणं, शेतकऱ्यांसह जळगावला अभ्यास दौरा करणं, कार्यकर्त्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कार्यशाळा आयोजित करणं असे अनेक कल्पक उपक्रम आ अभिमन्यू पवार नियमितपणे राबवत असतात.
आ अभिमन्यू पवार हे जितके आक्रमक आहेत तितकेच ते संवेदनशील आहेत. औसा मतदारसंघासह राज्यातील हजारो रुग्णांनी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आणि अडचणीतील नागरिकांनी त्यांची संवेदनशीलता अनुभवली आहे. सोयाबीनची बनिम झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियाला भेटायला गेल्यानंतर त्या शेतकरी कुटुंबातील लेकरांच्या हातावरील फोड पाहून डोळ्यात अश्रू येणं आणि त्या अश्रुंचे पुढे चालून "शेत तिथे रस्ता" अभियानरुपी फुलं होणं हे त्यांच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे.